पाण्यासाठी नागाव सरपंच आक्रमक; शास्त्रीनगरच्या पाण्याची समस्या सोडविण्यास जिल्हा परिषद उदासीन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
उमटे धरण पाण्याने तुडूंब भरूनही नागावमधील शास्त्रीनगरमधील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत. या गावाला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचा त्रास या गावातील हजारो नागरिकांना होत आहे. वारंवार पत्र देऊनही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्यासह ग्रामस्थ, महिलांनी गुरुवारी (दि.27) दुपारी एकत्र येत पाणी पुरवठा कार्यालयावर हल्लाबोल केला. आक्रमक भुमिका घेत तातडीने पाणी प्रश्न सोडविला नाही, तर होणाऱ्या परिणामाला जिल्हा परिषदेला सामोरे जावे लागेल, अशा इशारा सरपंच यांच्यासह ग्रामस्थ व महिलांनी प्रशासनाला दिला.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाद्वारे नागावमधील शास्त्रीनगर या गावाला पाणी पुरवठा होतो. उमटे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमधून नागावमधील शास्त्रीनगर या गावाला सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे काही दिवसांपुर्वी सरपंच हर्षदा मयेकर यांनी काही महिलांसमवेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली. पाण्याच्या समस्येची जाणीव करून दिली. शास्त्रीनगर गावाला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 300 मि. मी. व्यासाच्या बीडाच्या मेन पाईपलाईनवर शास्त्रीनगर येथे वॉल्व्ह बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र गेली अनेक दिवस उलटूनही त्याची कार्यवाही झाली नाही. वॉल्व्ह बसविण्यासाठी लागणाऱ्या मटेरिअलसाठी निधी नसल्याचे कारण संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यात नागावमधील शास्त्रीनगर गावात पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. तरीदेखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्यासह तेथील महिला व ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेतली.
अखेर अलिबागमधील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर एकत्रित येऊन हल्लाबोल केला. तसेच प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे दुरुस्तीसाठी निधी नाही, ही मोठी चिंताजनक परिस्थिती असल्याची प्रतिक्रीया मोहित भोईर यांनी व्यक्त केली. येत्या आठ दिवसांत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शास्त्रीनगर येथील पाण्याचा प्रश्न सोडविला नाही, तर होणाऱ्या परिणामाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल अशा इशारा ग्रामस्थ व महिलांनी दिला.
नागाव ग्रामपंचायत हद्दीतील शास्त्रीनगरमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न भेडसावतो. आता तर ऐन पावसाळ्यातही ही समस्या निर्माण झाली आहे. धरण पाण्याने भरून वाहत असताना गावांमध्ये पाणी नाही, ही चिंताजनक बाब आहे. शास्त्रीनगर येथे वॉल्व्ह बसविण्याची मागणी केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे महिलांमध्ये जिल्हा परिषद ग्राामीण पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सहकार्य करावे.
हर्षदा मयेकर,
सरपंच, नागाव ग्रामपंचायत
