गतिरोधक उभारण्याची मागणी
| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या नागोठणे परिसरात ठप्प झाले आहे. बहुतांश ठिकाणी तर चौपदरीकरणाचे काहीच काम झालेले नाही. तर काही ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आले आहे, असे असतांना नागोठण्यातील रहदारीसाठी महत्वाच्या अशा रामनगर समोरील महामार्गावरील दोन गतिरोधक अर्धे तोडण्यात आले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
रामनगर समोरील महामार्ग ओलांडून ये-जा करणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. या रस्त्याच्या पलीकडे पूर्वेकडील भागात रामनगर ही मोठी वस्ती, रेल्वे कॉलनी तसेच रेल्वे स्थानक असल्याने हा धोकादायक महामार्ग ओलांडूनच ये-जा करावी लागते. याशिवाय रामनगर या वसाहती मधील नागरिकांना हा महामार्ग ओलांडूनच नागोठण्यात बाजारहाट करण्यासाठी व इतर कामांसाठी यावे लागते. तसेच नागोठण्यातील प्रवाशांनाही रेल्वे स्थानक गाठण्यासाठी हा महामार्ग ओलांडूनच यावे लागत आहे.
सद्य परिस्थितीत येथील दोन्ही गतिरोधकांची काढण्यात आलेली बाजू मोकळी झाली आहे. असे असतांनांच मुंबई बाजूकडून महाडकडे व महाड बाजूकडून मुंबईकडे जाणारी वाहनेही अनेकदा त्यांचा सरळ मार्ग सोडून गतिरोधकावरुन जाणे टाळण्यासाठी अर्घे गतिरोधक काढलेल्या जागेवरून जात असल्याने या ठिकाणी महामार्ग नागरिकांना ये-जा करण्यासाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे भरधाव येणाऱ्या गाड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. येथे एखादा मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या रस्त्यावर तातडीने संपूर्ण गतिरोधक उभारावेत अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
