जिल्ह्यातील औषध निर्माण क्षेत्राला धोका
। वावोशी । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात अनेक औषध निर्मिती कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये सध्या निर्माण होणार्या औषधांपैकी तब्बल 88 टक्के औषधांमध्ये कच्चा माल म्हणून वापरात येणारे मआयसोप्रोपाईल अल्कोहोलफ हे नॉन-आयपी ग्रेड असून, ही औषधे सेवन करणार्यांसाठी जितकी धोकादायक आहेत तितकीच औषध निर्मिती क्षेत्रासही धोकादायक आहेत अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील माजी तंत्र अधीक्षक व या क्षेत्रातील तज्ञ विजयकुमार संघवी यांनी दिली आहे.
औषधांमध्ये सर्रास वापरले जाणारे आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे सामान्यतः आपल्या घरांत, कार्यालयांत, सिनेमा हॉलमध्ये, हॉटेल्समध्ये तसेच शॉपिंग मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणार्या हॅन्ड सॅनिटायझर मधील महत्वाचा घटक आहे. भारतात औषध निर्मिती क्षेत्रात वापरल्या जाणार्या 1 लाख मेट्रिक टन आयसोप्रोपाईल अल्कोहोल पैकी केवळ 12 टक्के आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे आयपी ग्रेड व औषध निर्माण गुणवत्तेचे असते आणि उर्वरित नॉन-फार्मा ग्रेड आहे, असे निदर्शनास आले आहे. विजयकुमार संघवी यांच्या मते, ड्रॅग अँड कॉस्मेटिकस ऍक्ट च्या दुसर्या भागातील 16व्या कलमानुसार औषध निर्मितीतील आयपी ग्रेडच्या आयसोप्रोपाईल अल्कोहोल बद्दलचे नियम ठळक असतानादेखील वास्तवात मात्र नॉन आयपी ग्रेडचे आयसोप्रोपाईल अल्कोहोल वापरले जाते, हे दुर्दैवी आहे.
औषधांत वापरले जाणारे हे नॉन आयपी ग्रेडचे आयसोप्रोपाईल अल्कोहोल यूव्ही ऍबसॉर्बन्स टेस्ट (अतिनील अवशोषण चाचणी), बेन्झीन अँड (आर) सबस्टन्स, नॉन वोलाटाईल रेसिड्यू (अस्थिर अवशेष/पदार्थ) तसेच ऍसिडिक (आम्लता) व अल्कलाईन (क्षारता) या गुणवत्तेच्या कसोटीवर अयशस्वी ठरत आहेत; त्यामुळे मग कमी दर्जाचा कच्चा माल वापरून सुमार दर्जाची औषधे बनवली जातात असेही ते म्हणाले. आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे प्रोपेलिन वा ऍसिटोन वापरून बनवले जाते. आयसोप्रोपाईल अल्कोहोल बनवण्यासाठी अमेरिका व युरोपातील कंपन्या बहुतांशी प्रोपेलिन वापरतात तर चिनी व कोरियन कंपन्या ऍसिटोन वापरतात. प्रोपेलिनने बनवलेल्या आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये प्रोपेल अल्कोहोल व ऍसिटोनची मात्रा नगण्य असते. त्यामुळे औषध निर्मितीस फारसा धोका नसतो.
ऍसिटोन वापरून बनवलेल्या आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये बेन्झीन जास्त प्रमाणात आढळते, कारण एसीटोन हे फिनॉल उत्पादनातील सह-उत्पादन आहे आणि हे औषध निर्मितीस घातक आहे. हे फार्मा उत्पादकांसाठी आव्हाने निर्माण करू शकतात तसेच आयात केलेले व बंदरांवर साठवणूक केलेल्या आयसोप्रोपाईल अल्कोहोलची देखील गुणवत्ता फार चांगली असते असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा आयसोप्रोपाईल अल्कोहोल चा वापर औषध निर्मितीत करणे म्हणजे वापरकर्त्यांचा जीव धोक्यात घालणे आणि पर्यायाने औषध कंपन्यांना बट्टा लागण्याची शक्यता अधिक आहे.
विजयकुमार संघवी
