रायगड मधील राजपुरी येथे दरड कोसळली; ४ घरांचे नुकसान !

8 कुटूंबातील 35 जणांना सुस्थळी हलवले
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड मधील राजपुरी येथे दरड कोसळली; ४ घरांचे नुकसान रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे सतत पडत असलेल्या पावसाने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आहे. दरड कोसळून 3 ते 4 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरडग्रस्त भागातील 8 कुटूंबातील 35 जणांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.

जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यत 215 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात 18 आणि 19 जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रेड अलर्टच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.

रायगड जिल्ह्यात सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील वस्ती ही डोंगर भागात आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. 12 जुलै रोजीही झालेल्या मुसळधार पावसाने राजपुरी येथे एका झोपडीवर दरड कोसळली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नव्हते.

आज पुन्हा सायंकाळी राजपुरी येथे दरड कोसळली असून तीन ते चार घरांचे नुकसान झाले आहे. मुरुड तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाने दरड ग्रस्त भागातील आठ कुटूंबातील 35 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविले आहे. आठ कुटूंबातील या व्यक्तीच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.

Exit mobile version