। महाड । प्रतिनिधी ।
महाड भोर मार्गावरील वरंध घाटा मधे वाघजाई मंदिराजवळ आज सकाळी दरड कोसळल्याने एक जण जखमी झाला आहे. ही दरड लहान स्वरूपात असल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. महाड भोर मार्गावरील वरंध घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने दरडी कोसळून मार्ग धोकादायक होतो. या घाटात वारंवार दरड कोसळून घाटातील वाहतूक विस्कळीत होत असत. अनेकदा हा घाट बंदही ठेवण्यात आलेला होता.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या घाटात 30 हून अधिक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. गेले दोन दिवसांपासून महाडमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने आज सकाळी वरंधा घाटात वाघजाई मंदिराजवळ डोंगरातून ओसरा खाली आल्याने मंदिराजवळ खाद्यपदार्थ विकणारे अरुण पवार हे जखमी झाले आहेत. या घाटामध्ये महामार्ग विभागाकडून ठेवण्यात आलेल्या जेसीबी द्वारे दरड त्वरित काढण्यात आली त्यामुळे अरुण पवार यातून बचावले. त्यांना पुढील उपचारासाठी महाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दरड रस्त्याच्या एकाच बाजूला कोसळल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अमोल महाडकर यांनी सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सुरक्षितेच्या दृष्टीने वरंधा घाटाची दुरुस्ती केली जाते त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात परंतु जे कामे केली जातात ती योग्य नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे यावर्षी खर्या अर्थाने पावसाला सुरुवात झालेली नसताना घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. प्रवाशांनी, वाहनचालकांनी घाटातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे.