शाळेत रडते म्हणून पोटच्या मुलीला लाथेनी मारहाण

| पनवेल | प्रतिनिधी |

नव्यानेच अंगणवाडीत जाणारी अडीच वर्षाची चिमुरडी ही शाळेत रडते म्हणून रागाच्या भरात पोटच्या पोरीला लाथेने मारहाण केल्याची घटना पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरात घडली आहे. या संदर्भात सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त करून सदर मातेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे ही घटना घडली आहे. शाळेत गेल्या सहा दिवसापासून ही अडीच वर्षाची चिमुरडी जात होती. परंतु, शाळेमध्ये तिचे मन लागत नव्हते त्यामुळे ती सतत रडायची, अशाच प्रकारे काल सुद्धा तीची आई तिला सोडण्यास गेली असताना ती रडायला लागल्याने अंगणवाडीच्या दरवाजात तिने आपल्या मुलीला लाथेने मारले व हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याची दखल पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली व तातडीने सदर मुलीच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात आणून त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सदर मुलीला तिच्या आईसह सध्या शासनाच्या बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version