नागोठण्यात भर दिवसा चोरी

62 हजारांचा मोबाईल लंपास; चोरटा सीसी टीव्ही कॅमेरात कैद

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठण्यातील गजबजलेल्या अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानात सोमवारी (दि.27) भर दिवसा मोबाईल चोरी होण्याची घटना घडली. तस्मित इंटरप्रायजेस या दुकानातून 62 हजारांचा मोबाईल चोरट्याने लंपास केला आहे. या चोरीमुळे शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छ. शिवाजी महाराज चौकातील मोबाईल ॲक्सेसरीज, रिचार्ज व झेरॉक्सचे दुकान असलेल्या तस्मित इंटरप्रायजेस या दुकानाचे मालक नसीम इलामी हे आपल्या दुकानाचे शटर अर्धे खाली करून जेवायला गेले होते. ही संधी साधून चोरट्याने दुकानात प्रवेश केला आणि चार्जिंगला लावलेला मोबाईल हातचलाखीने चोरून नेला आहे. हा चोरटा सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे नागोठणे पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत. चोरट्याने दुकानावर पाळत ठेऊन हा प्रकार केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारे भरदिवसा होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागोठण्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. रिलायन्स कंपनीच्या विस्तारित प्रकल्पात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार नागोठणे शहर व परिसरात राहण्यास आले असून, दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. तर मेडिकल टेस्ट मध्ये अनफिट झालेले काही कामगार परत जात असल्याने ते अशाप्रकारे चोरीच्या घटना घडवून आणत असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version