कर्जत शहरात भरदिवसा घरफोडी; 4 लाख किंमतीचे दागिने लंपास

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरात भरदिवसा घरफोडी करुन दागिन्यांची चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील नागरीकरण झालेल्या मुद्रे भागातील नानामास्तर नगर परिसरात घडली असून, याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत शहरातील मौजे मुद्रे भागातील नानामास्तर नगर परिसरात विजय हॉरिजन ही इमारत आहे. या इमारतीत केदार खोडागळे यांचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते. त्यांच्या पत्नी करुणा खोडागळे या पलीकडे असलेल्या इमारतीत राहणार्‍या नातेवाईकांकडे काही कामासाठी गेल्या होत्या.
दुपारी दीड वाजता घरातून निघालेल्या करुणा दुपारी चार वाजता घरी परतल्या. तेंव्हा त्यांच्या घराची लोखंडी दरवाज्याला लावलेले लोखंडी कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेला स्टीलचा डब्बा गायब होता. या डब्ब्यांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने असून, याची ऐवजाची एकूण किंमत 4 लाख 83 हजार इतकी आहे.
याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक एस.एम.सोनवणे करित आहेत.

Exit mobile version