| पनवेल | वार्ताहर |
खारघर सेक्टर 35 येथील पांडवमार्ग सर्कलमधील मॅनहोल लगत मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दुचाकी वाहने अडकून अपघात होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने मॅनहोलची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. खारघर, सेक्टर 35 कडून तळोजाकडे जाणार्या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. दरम्यान सदर रस्त्यावरील पांडव मार्ग चौकातून पेठगाव, तळोजा आणि खारघर वसाहतीकडे जाणारा मार्ग आहे. पेठगावकडून पांडव मार्गाला वळसा घेऊन शीघ्र कृतीदलाकडे जाताना मॅनहोललगत मोठा खड्डा पडला आहे. वळसा घेताना हा खड्डा निदर्शनास येत नाही. त्यामुळे या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पालिकेने मॅनहोलवर झाकण बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.