संगीत रंगभूमीचा साक्षीदार
मुंबई | प्रतिनिधी |
रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक – अभिनेते पंडित रामदास कामत यांचे शनिवारी विलेपार्ले येथील त्यांच्या निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील ज्येष्ठ रंगकर्मी पडद्याआड गेला आहे.कामत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सांस्कृतिक कार्यक्रम अमित देशमुख आदींनी शोक प्रकट केला आहे.
रामदास कामत यांना 2015 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2009 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.