वडिलांच्या अपघातानंतर दहा दिवसांत अनुकंपा भरतीत घेतले सामावून
। माणगाव । प्रतिनिधी ।
तहसील कार्यालयातील कर्मचारी दिवंगत प्रदीप सोनावळे यांचे दि. 5 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर हा मोठा आघात होता. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कै. सोनावळे यांची मुलगी पूजाला अनुकंपा भरतीत सामावून घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकार्यांच्या संवेदनशील आणि प्रशासनाच्या सक्रीयतेमुळे सोनावळे कुटुंबातील वारसाला हक्काचा रोजगार मिळाला आहे.
उपविभागीय अधिकारी संदिपान सानप व तहसीलदार माणगाव विकास गारुडकर यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. त्याचप्रमाणे दिवंगत प्रदीप सोनावळे यांची मुलगी कुमारी पूजा सोनावळे हिला अनुकंपा भरतीसाठी अर्ज करण्यास मार्गदर्शन केले आणि सोनवळे कुटुंबियांवर असलेले दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. दि. 15 ऑगस्ट रोजी पूजा सोनावळे हिला उपविभागीय अधिकारी माणगाव यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या संवेदनशीलतेमुळे व प्रशासनाच्या सक्रिय योगदानामुळे आज एका दिवंगत सरकारी कर्मचार्याच्या वारसास दहा दिवसांत अनुकंपा भरतीमध्ये नियुक्ती आदेश मिळण्याची ही कदाचित महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी. खर्या अर्थाने आज महसूल सप्ताहाचा उद्देश सफल झाला आहे, असे वाटते.