गृहनिर्माण प्रकल्पातील अर्जदारांना दिलासा
| नवी मुंबई | वार्ताहर |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडको महामंडळामार्फत सन 2018 ते 2022 दरम्यान नवी मुंबईतील तळोजा, सेक्टर- 34 व 36 येथे विविध विकसित करण्यात आलेल्या विविध महागृहनिर्माण योजनांमधील जे यशस्वी अर्जदार भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याच्या तारखेपूर्वी सर्व हप्त्यांचा भरणा करतील अशा अर्जदारांचे संकीर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या गृहनिर्माण प्रकल्पांकरिता अद्याप भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने, सदर अर्जदारांसमवेत करारनामा करून वाटप करण्यात येणार्या सदनिकेचा ताबा देण्यास विलंब होत असल्याने संकीर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.
भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने सिडकोच्या तळोजा येथील गृहनिर्माण योजनांतील अर्जदारांना सदनिकांचा ताबा मिळण्यास विलंब होत होता. हे लक्षात घेऊन जे अर्जदार भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याच्या तारखेपूर्वी सर्व हप्त्यांचा भरणा करतील अशा अर्जदारांना भरावे लागणारे संकीर्ण शुल्क माफ करण्याबाबतचे निर्देश सिडकोला देण्यात आले. त्यानुसार, संकीर्ण शुल्क माफ करून अर्जदारांवर कुठलाही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ज्या अर्जदारांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याच्या तारखेपूर्वी सर्व हप्त्यांचा भरणा केलेला असेल ते अर्जदार संकीर्ण शुल्क माफीसाठी पात्र असतील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.