तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा

माणगाव, म्हसळासह रोह्यातील शेतकऱ्यांची मागणी

| माणगाव | प्रतिनिधी |

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला बसतो. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, तर कधी पावसाने पाठ फिरवल्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर करपून जाते. वर्षभर कष्ट करून, कर्ज काढून आणि मोठ्या आशेने पिकवलेल्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तर शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक गणितच कोलमडते. सध्या अशाच संकटाचा सामना रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा आणि रोहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात यापूर्वी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आणखी 13 तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा आणि रोहा या तालुक्यांचाही या प्रक्रियेत समावेश व्हावा, यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष प्रयत्न करत शासनाकडे आग्रही मागणी केली होती. माणगाव, म्हसळा आणि रोहा तालुक्यांमध्ये शेती हा अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. भातशेतीबरोबरच नाचणी, कडधान्ये आणि विविध हंगामी पिकांवर येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, पावसाचे अनियमित प्रमाण, पाण्याची कमतरता आणि बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, काही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशाही मावळली आहे.

Exit mobile version