। पनवेल । प्रतिनिधी ।
पावसाळा सुरू असल्याने गाढेश्वर धरण, मोरबे धरण, माची प्रबळ याठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. तरीदेखील पर्यटकांची मोठी गर्दी गाढी नदीच्या परिसरात होताना दिसून येत आहे.
नेरे-वाजे, मोरबे परिसरात येणाऱ्या वाहनांची पोलीस तपासणी करत आहेत. शेकडोंच्या संख्येने दुचाकी गाड्या, चारचाकी गाड्या धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी येत आहेत. अनेक वाहनांना पोलीस आल्या पावली परत पाठवत आहेत. त्यामुळे पर्यटक चोरवाटा शोधून धरणाच्या परिसरात जातात. त्यामुळे पोलिसांनीदेखील कुठे कुठे बंदोबस्त ठेवायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे व वाट मिळेल तिकडे पर्यटक नदीत जात असल्याने पोलीसदेखील हतबल झाले आहेत. पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली असली तरीदेखील मद्याच्या नशेत काहीजण वाहन चालवत अपघाताला आमंत्रण देताना दिसून येत आहे.
शनिवार-रविवारी वाहनांची संख्या प्रचंड वाढत असल्याने नवीन पनवेल, सुकापूर, आकुर्ली, नेरे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. याचा त्रास स्थानिकांना होत आहे. दरम्यान, धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांकडून धबधब्याजवळ जाण्याचे प्रकार घडत आहेत.