जेएनपीएत मालाच्या वाहतुकीस विलंब

वाहतूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान; रस्त्यांवर संथगतीने चालणाऱ्या वाहनांची गर्दी

| चिरनेर | प्रतिनिधी |

मागील चार पाच दिवसांपासून जेएनपीए अंतर्गत बंदरे आणि सीएफएस परिसरातील सातत्याने होणारी वाहतूक कोंडींची समस्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. यामुळे मालवाहतूकीसाठी होणाऱ्या विलंबामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या वाहनचालक व वाहतूकदारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्भवलेल्या या गंभीर समस्येची विविध आयात-निर्यातदार कंपन्या, शिपिंग लाईन्स, सीएफएस आदींना माहिती करून देण्यासाठी विविध वाहतूकदार संघटनांनी व्यापारी सुचना (ट्रेड डव्हायजरी) जारी केली आहे.

जेएनपीए येथील पोर्ट टर्मिनल्स आणि सीएफएस दरम्यान एक्झिम कंटेनर्सच्या वाहतुकीत सातत्याने व्यत्यय येत आहे. यामुळे बंदर, विविध सीएफएसमध्ये ये-जा करणारे हजारो कंटेनर ट्रेलर उरण, जेएनपीए परिसरातील ठिकाणांच्या रस्त्यांवरच 40-60 तासांपर्यंत अडकून पडतात. अनेक वेळा तर अडकून पडलेल्या वाहनांच्या रांगा जेएनपीए -एनएसआयसीटी ते द्रोणगिरी हद्दीतील डीआरटी पुलाच्या पलीकडे सुमारे 15 किमी अंतरापर्यंत जात आहेत. ज्यामुळे एनएसआयसीटीच्या प्रवेशद्वाराबाहेर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे कंटेनर ट्रेलरसाठी नाहक प्रतीक्षा आणि टर्नअराउंड वेळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जेएनपीए अंतर्गत असलेली पाचही बंदरे आणि विविध सीएफएस, टर्मिनलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर संथगतीने चालणाऱ्या वाहनांची गर्दी होत आहे.

मागील 4 ते 5 दिवसांपासून तर एनएसआयसीटी टर्मिनलवरील वाहतूक परिस्थितीच्या साखळी परिणामामुळे गर्दी गंभीर टप्प्यावर पोहोचली आहे. यामुळे टर्मिनलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होणारा विलंब हा सीएफएसच्या नियंत्रणाबाहेर आहे. ज्यामुळे इतर टर्मिनल्सकडे जाणाऱ्या वाहतुकीतही मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, सामान्य कार्यचक्राच्या तुलनेत वाहनांची ये-जा करण्याची वेळ अस्वीकार्य अशा 20-25 तासांपर्यंत वाढला आहे. अशा अतिरिक्त विलंबामुळे वाहने पडून राहणे, चालकांना थांबवून ठेवणे, इंधनाचा वाढलेला वापर आणि वाहनांच्या तैनातीतील व्यत्यय यामुळे वाहतूकदारांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून निर्माण होणाऱ्या अकार्यक्षमतेचा परिणाम आयात-निर्यात एक्झीम मालाच्या एकूण वाहतुकीवरच नव्हे तर जेएनपीए बंदरातून होणाऱ्या व्यापारावरही विपरीत परिणाम होत आहे. परिस्थिती आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे की चालक आणि वाहतूकदारांमध्ये प्रचंड निराशा आणि नाराजी आहे.

त्यामुळे कंटेनर वाहतुकीमध्ये सध्या होत असलेला परिणामकारक विलंब हा मालवाहतुकदारांच्या कोणत्याही त्रुटींमुळे नाही. तर उरण, जेएनपीए परिसरात सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आहे. म्हणून, कोणत्याही विलंबासाठी आणि त्याच्या विपरीत परिणामांसाठी जबाबदार राहणार नाहीत असे कंटेनर फ्रेट स्टेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया, न्हावा-शेवा कंटेनर ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशन, न्हावा-शेवा डेपो कंटेनर असोसिएशन आदी कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या संघटनांनी विविध आयात-निर्यातदार कंपन्या, शिपिंग लाईन्स, सीएफएस आदींना माहितीसाठी विविध वाहतूकदार संघटनांनी व्यापारी सुचना जारी केली आहे.

पुरेशी संसाधने तैनात करा
एनएसआयसीटी बंदराच्या गेटच्या बाहेरील वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थेचा तात्काळ आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा करावी. वाहतूक कोंडी बाधित भागांमध्ये वाहनांची सुरळीत आणि नियंत्रित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी संसाधने तैनात करावीत, वाहनांच्या अतिरिक्त रांगा कमी करण्यासाठी आणि वाहनांची परत येण्याची वेळ पुन्हा वाजवी परिचालन पातळीवर आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या आदी सूचनाही करण्यात आली आहे.
Exit mobile version