। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यामध्ये सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्याची उभी पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकर्याच्या तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. आता पुढे काय करायचे, कसे जगायचे, असा प्रश्न शेतकर्यासमोर उभा राहिला आहे. यामुळे कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेने कर्जत तहसिलदार यांची भेट घेऊन पंचनामा करून भाताच्या पिकाबद्दल नुकसान भरपाई करण्याची मागणी केली. कर्जत तहसीलदार यांच्याकडून निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, भालचंद्र सांबरी, लक्ष्मण खंडवी, बबन शेंडे, नारायण मेंगाळ, बाळकृष्ण शिंगवा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.