। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली वसाहती मधून कामोठे वसाहतीत जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्याची मागणी नगरसेवक विजय खानावकर यांनी केली आहे. नगरसेवक खानावकर यांनी पालिका आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. सायन -पनवेल हा महामार्ग कायम वर्दळीचा म्हणून ओळखला जातो.
कळंबोली शहरातील नागरिकांना रेल्वेच्या प्रवासासाठी दररोज मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे जावे लागते. सकाळच्या वेळी मानसरोवरकडे जाण्यासाठी आणि सायंकाळी कळंबोलीच्या दिशेने येण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. नागरिक, विद्यार्थी आणि चाकरमान्यांना दररोज महामार्ग उड्डाणपुलाखालून ओलांडावा लागतो. याशिवाय शीव-पनवेल महामार्गाने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी बसथांब्यावर देखील जावे लागते. कळंबोली मॅकडोनाल्ड येथील प्रवासी बसथांबा सर्कलच्या कामामुळे स्थलांतरीत करण्यात आला आहे. तेव्हापासून येथे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. परगावाहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना कामोठे आणि कळंबोलीत ये-जा करण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते आहे. कळंबोलीहून कामोठ्याकडे जाण्यासाठी शीव-पनवेल महामार्ग ओलांडून जाणे पादचाऱ्यांना गैरसोयीचे ठरत आहे. कळंबोली मॅकडोनाल्ड येथील केएलई महाविद्यालयाजवळ स्थलांतरीत केल्यानंतर प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडली आहे. नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी येथे स्कायवॉकची गरज निर्माण झाली आहे.
सायन – पनवेल महामार्गावर पादचारी पुलाची मागणी
