ठोक मानधनावर अधिपरिचारिकांची नियुक्ती

सरळसेवा भरतीचा वाकडा मार्ग

। पालघर । प्रतिनिधी ।

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या 10 अधिपरिचारिकांनी पालिका सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा मागे घेण्याच्या अटीवर त्यांना सरळसेवा भरतीची कोणतीही प्रक्रिया न राबविता प्रशासनाने 31 जानेवारी रोजी थेट सेवेत कायम केल्याचे समोर आले आहे. यात मोठ्याप्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला जात असून याची चौकशी करून नियमबाह्य पद्धतीने केलेली ही भरती रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.

पालिकेच्या मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ठोक मानधनावर अधिपरिचारिकांची नियुक्ती करण्यात आली होती. कामगार कायद्यानुसार एखाद्या कामगाराने अथवा कर्मचार्‍याने संबंधित आस्थापनेत 240 दिवस काम केल्यास त्याला सेवेत कायम असल्याचे मानले जाते. मात्र, यापूर्वी नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबविणे अपेक्षित असते. या प्रक्रियेला बगल देत पालिकेत कंत्राटी तसेच ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या अनेक कमर्चारी अथवा कामगारांना शासकीय आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावून सेवेत कायम केल्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. ठोक मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविणे अपेक्षित असताना तिला बगल देण्यात आली.

यातच काही अधिपरिचारिकांनी राज्याऐवजी परराज्यातून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्याचा दाखला जोडला असल्याचे समोर आले असून त्याची पडताळणी करण्याची तसदी प्रशासनाकडून घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापूर्वी पालिकेत रखवालदार पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याला थेट जनसंपर्क अधिकारी पदावर सामावून घेतल्याचा प्रकार घडला होता. या पदासाठी आवश्यक ठरलेले प्रमाणपत्रे बोगस असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी त्या रखवालदाराला सेवेतून बडतर्फ केले. 10 अधिपरिचारिकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेताना अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी दोनच पदे राखीव असताना तब्बल 4 जणांची नियुक्ती केल्याचा नियमबाह्य प्रकार उघडकीस आला आहे. याखेरीज ही भरती प्रक्रिया राबविताना प्रशासनाने कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही.

Exit mobile version