मानसरोवर जळीतकांड नुकसान भरपाईची मागणी

| कामोठे | वार्ताहर |

काल दुपारी मानसरोवर रेल्वे स्टेशन जवळील पार्किंगमधे उभ्या असलेल्या दुचाकींना आग लागल्याची घटना घडली. ह्या आगीत नुकसान झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी कामोठे कॉलोनी फोरमतर्फे करण्यात आली आहे.

या घटनेची दखल घेत आज कामोठे कॉलोनी फोरमतर्फे घटनास्थळाची पाहणी करत सिडको तसेच रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेमुळे सिडकोने नागरिकांच्या हक्काची पार्किंग हिरावून घेतली. अडीच ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या कामोठे शहराला पुरेसे पार्किंग उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत आहे. कामोठे कॉलोनी फोरमतर्फे यापूर्वी वारंवार सिडको प्रशासनाकडे पार्किंग साठी पाठपुरावा केलेला असुन सिडकोला विषयाचे गांभीर्य कळलेले नाही. कालच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत सिडकोने नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कॉलोनी फोरम तर्फे करण्यात आली. तसेच रेल्वे स्टेशन मास्तर ह्यांना जाब विचारला असता त्यानी आधीच सिडको प्रशासनाला स्टेशन परिसरातील सुकलेले गवत कापण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळाली, सिडकोने जर वेळीच कारवाई करत स्टेशन परिसरातील गवत साफ केले असते तर काल लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली नसती. त्यामूळे झालेल्या नुकसानास सिडकोचा हलगर्जीपणा सुद्धा जबाबदार आहे. असा आरोप फोरमतर्फे करण्यात आला आहे.

तसेच काल स्टेशन परिसरात लागलेली आग निव्वळ अपघात होता की घातपात ह्याची सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची कामोठे पोलिस स्टेशनला लेखी मागणी कामोठे कॉलोनी फोरमतर्फे करण्यात आली. यावेळी अध्यक्ष मंगेश आढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, शुभांगी खरात, बापू साळुंखे, राहुल बुधे, संदिप इथापे, रवी पाढी, निरव नंदोला, जयवंत खरात, प्रविण भालतडक उपस्थित होते.

अपुर्‍या पार्किंगला सिडको जबाबदार आहे. ह्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच पोलिस प्रशासनाने ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी.

मंगेश अढाव
अध्यक्ष कामोठे कॉलोनी फोरम
Exit mobile version