| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासहित मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. या बळीराजाला आधार म्हणून शासनाने शेतीचे पंचनामे करुन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड व तहसीलदार किशोर देशमुख यांनी निवेदन स्वीकारून तातडीने पंचनामा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास झालेला जोरदार पाऊस व चक्रीवादळ यामुळे उभे पीक अक्षरश: जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, चुकीचे ऑनलाईन नकाशे ल्याने पीक पहाणी होत नाही. आंबा पीक विमा भरलेल्या हफ्त्यापेक्षा कमी विमा मिळत आहे. त्यामध्ये ऍग्रिस्टॅग बंधनकारक केल्याने शेतकरी लाभापासून वंचित आहेत. या विषयी खा. सुनिल तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांनी जातीने लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन रोहा प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, उपाध्यक्ष अंनत मगर, खेळू थिटे, सहसचिव संतोष दिवकर, संचालक विनोद पाटील, भाऊ डिके, रघुनाथ कडू, दगडू बामुगडे, रामचंद्र सकपाळ व रमेश पाटील आदी उपस्थित होते.







