| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील महत्त्वाचे सापे वामणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्निर्माणानंतर प्लॅटफॉर्मची उंची कमी झाल्याने प्रवाशांना चढ-उतार करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांसह स्थानक विकासासाठीच्या 11 मागण्यांचे निवेदन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवक व महिला मंडळाने रत्नागिरी येथील कोकण रेल्वे विभागीय कार्यालयात सादर केले. हे निवेदन क्षेत्रीय रेल प्रबंधक शैलेश बापट यांना देण्यात आले.
महाड तालुक्यातील महत्त्वाचे सापे वामणे रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्माण करण्यात आले होते. परंतु, हे स्थानक विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे प्रवशांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यासाठी रत्नागिरीतील कोकण रेल्वे विभागीय कार्यालयात विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी निवेदन देण्यात आले. त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मची उंची व लांबी वाढविणे, छत, पादचारी पूल व प्रवेशद्वार उभारणे, 24 डब्यांच्या गाड्यांसाठी सुविधा उपलब्ध करणे, मुख्य रस्ता ते स्थानक रस्ता तयार करणे, पनवेल-चिपळूण मेमू कायमस्वरूपी करणे, तसेच जनशताब्दी व मांडवी एक्सप्रेसला सापे वामणे येथे थांबा देणे या महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. तसेच, स्थानिकांना व गुरांना सुरक्षित भुयारी मार्ग द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
या मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देताना क्षेत्रीय रेल प्रबंधक शैलेश बापट यांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून स्थानक विकासाचा आराखडा तयार केला जाईल आणि प्रवाशांसाठी बसण्याची आसनव्यवस्था पुढील 10-15 दिवसांत केली जाईल, असे सांगितले.







