| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पाडा येथील रेल्वे क्रॉसिंग वरील गेट क्रमांक 21 बंद केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या परिसरात रेल्वेकडून ओव्हर ब्रिज बनविला जाणार असून सध्याच्या अस्तित्वात असलेल्या फाटक परिसरात रेल्वे मार्गाच्या खाली भुयारी मार्ग बनविण्यात यावा, अशी मागणी पाडा ग्रामस्थांनी केली आहे. अशा आशयाचे पत्र खासदार तटकरे यांना देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ स्टेशन जवळील नेरळ पाडा येथे असलेल्या रेल्वे क्रॉसिंग वरील गेट क्रमांक 21 बंद करून त्याऐवजी रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम प्रस्तावित आहे. भविष्यात उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नेरळ पाडा गेटमधून येणे-जाणे बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे नेरळ पूर्व भागातील व परिसरात असलेल्या गावांतील ग्रामस्थांची नेरळ मध्ये बाजारहाट करण्यासाठी, मुलांना शाळेत नेण्यासाठी, रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी त्रासाचे होणार आहे. अशावेळी स्थानिकांना उड्डाण पुलावरून वळसा घालून जावे लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वापार असलेल्या हिंदू समाजाच्या स्मशानभूमी आणि मुस्लिम धर्मीय दफन भूमी नेरळ पश्चिमकडे आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी प्रेत स्मशानात घेऊन जातांना खूप मोठा वळसा घालावा लागणार आहे. रेल्वेने त्यांच्या भागात सुधारणा करतांना नागरिकांसाठी असलेला जवळचा मार्ग बंद करू नये. उड्डाण पुलाचे बांधकाम प्रस्तावित करतांना रेल्वेने नागरिकांच्या कोणत्याही प्रकारे हरकती मागविल्या नाहीत की सूचना मागविल्या नाहीत. हजारो लोक रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस राहतात. आणि त्यांना विविध कामांसाठी परस्पर विरुद्ध भागात चालत जावे लागते. त्यांना प्रत्येकवेळी उड्डाण पुलावरून जाणे शक्य नाही.
दरम्यान, उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यापूर्वीच नेरळ पाडा रेल्वे गेटच्या जागी रेल्वे लाईन खालून चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी व दुचाकीसाठी कमान 12 फूट रुंद व 7 फूट उंचीचा भुयारी मार्ग बांधून द्यावा. त्यासाठी रेल्वे खात्याकडे पाठपुरावा करण्यात यावा. त्यांनतर पूल मंजूर करून घ्यावा, अशी विनंती करणारे निवेदन स्थानिक रहिवाशी सूर्यकांत चंचे यांच्याकडून सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे केले जात आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून संबंधित जागेची पाहणी किंवा स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे याबाबत ग्रामस्थ सूर्यकांत चंचे यांनी खासदार तटकरे यांना निवेदन दिले आहे.
भुयारी मार्ग बांधण्याची मागणी
