| माणगाव । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे विकसनशील शहर म्हणून माणगावकडे पहिले जाते. घटनेचे शिल्पकार, क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने माणगाव येथे सर्वसोयींनीयुक्त प्रशस्त जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत उभारावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मागणी करणार असल्याची माहीती स्वराज्य संघटना तथा बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक पंकज तांबे यांनी माणगाव येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की, माणगाव-तळा तालुक्यात बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे. अनेक विद्यार्थी गैरसोयीमुळे शहराकडे शिक्षणासाठी जातात. मात्र तेथे त्यांना राहण्याची व्यवस्था नसते. तसेच आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षणा अभावी गावाकडील रस्ता धरतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी व समाज बांधवाना माणगाव सारख्या मध्यवर्ती ठिकाणी सर्वसोयींनीयुक्त भव्य व प्रशस्त इमारत उभारल्यास त्यांचा प्रश्न सुटेल. या करिता माणगाव येथे डॉ. आंबेडकर भवन उभारणे काळाची गरज आहे. अनेक वेळा ग्रामीण भागातील व परिसरातील असणार्या तालुक्यातील नागरिक रात्री-अपरात्री प्रवास करतात. मात्र ग्रामीण व अन्य तालुक्याला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नसते, त्यामुळे बस स्थानकावर रात्र काढावी लागते. यासाठी डॉ. आंबेडकर इमारतीमध्ये निवासाची सोय करावी अशी मागणी करणार असल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले.