| अलिबाग । प्रतिनिधी ।
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटीतून अर्ध तिकीट प्रवास करण्याची सोय एसटी महामंडळाने केली आहे. त्यामुळे एसटीतून महिलांचा प्रवास वाढू लागला आहे. रेवस, रोहा मार्गावर महिला प्रवाशांची संख्या भरमसाठ वाढत असल्याने एसटी बस अपुरी पडत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी एसटीतून प्रवास करीत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रेवस व रोहा मार्गावर बसेस वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अलिबाग आगारातून रोहा व रेवस मार्गावर तासातासाने एसटी बसेस सोडल्या जातात. या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या मोेठ्या प्रमाणात आहे. शाळा कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांसह नोकरी, व्यवसायानिमित्त व वेगवेगळ्या शासकिय कामानिमित्त अलिबागमध्ये येणार्यांची संख्या अधिक आहे. 17 मार्चपासून एसटी महामंडळाने महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाटी अर्ध तिकीट प्रवास करण्याची मुभा दिली आहे. या सवलतीचा फायदा महिला मोेठ्या प्रमाणात घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे रेवस व रोहा मार्गावर प्रवास करणार्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यात अन्य प्रवासीदेखील प्रवास करीत असल्याने या एसटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. एसटीबसमध्ये सुमारे 55 प्रवासी क्षमता आहे. परंतू 70 ते 80 प्रवासी सध्या प्रवास करीत आहे. त्यामुळे प्रवाशांना उभेदेखील राहता येत नसल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. प्रवासी वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. मात्र प्रवासी सुविधांपासून वंचित असल्याची ओरड प्रवासी वर्गाकडून होत आहे. अलिबाग आगारातून रेवस व रोहा मार्गावरील एसटीच्या फेर्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.