रायगडसह रत्नागिरी, मुंबई, पुणे येथून कांद्याला मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वाडगांव आदी परिसरातील गावांमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यामध्ये सुमारे 300 हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली आहे. काही शेतकर्यांनी एक ते दोन एकर जागेत तर काही शेतकर्यांनी दोन ते तीन गुंठे क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली. काहींनी घराच्या बाजूला परसबाग म्हणून कांद्याची लागवड केली आहे. कांदा काढणीच्या कामाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. सुरुवातीला कांद्याला प्रचंड मागणी मिळाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावला होता. मात्र, मागील महिन्यात कांद्याची मागणीच कमी झाली होती. तयार झालेला कांदा गोडाऊनमध्ये तसेच शेतामध्ये पडून होता. कांद्याच्या माळी तयार करून कांदा विक्रीसाठी तयार ठेवला होता. मात्र, व्यापार्यांकडून कांद्याची उचल झाली नव्हती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कांद्याला मागणी वाढू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिक ग्राहकांकडून कांदा खरेदी केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारात कांदा विकला जात असताना, पुणे, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येदेखील कांद्याला मागणी वाढू लागली आहे. मागणी वाढल्याने कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. मध्यम आकाराचा, व चांगल्या कांद्याला एका माळीमागे दीडशे ते दोनशे रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहे. एक मण म्हणजे चार माळी मागे सातशे रुपये द्यावे लागत आहे. त्यामुळे पांढर्या कांद्याला सुगीचे दिवस आले असून, कांदा उत्पादक शेतकरीदेखील समाधानकारक असल्याचे तेथील शेतकर्यांकडून बोलले जात आहे. कांद्याच्या उत्पादनातून एक कोटीहून अधिक उलाढाल होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
कांदा विक्रीचे ठिकठिकाणी स्टॉल
अलिबाग तालुक्यातील कार्लेसह पंचक्रोशीतील पांढर्या कांद्याला प्रचंड मागणी वाढली आहे. गोंधळपाडा पासून सागाव पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा कांदा विक्रीचे वेगवेगळे स्टॉल सुरु झाले आहेत. अलिबागला फिरण्यास येणारे पर्यटक व स्थानिक नागरिक या स्टॉलमधून कांदा खरेदी करीत आहेत. लहान आकाराच्या कांद्यापासून मध्यम व मोठ्या आकाराचे कांदे स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत. या स्टॉलमधून स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे.
उनाड गुरांचा उपद्रव
पांढरा कांदा खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या बाजारात कांद्याला मागणी वाढली आहे. आठवडाबाजारापासून ठिकठिकाणी कांदा विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र शेतामधील उनाड गुरांमुळे भाजीपाल्याची नासधुस होत असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. तळवली. सागाव, वाडगांव, धोलपाडा, या भागातील शेतकर्यांना उनाड गुरांचा प्रचंड त्रास होत आहे. रात्रीच्यावेळी ही उनाड गुरे शेतामध्ये घुसून भाजीपाला खातात. त्यांच्या उपद्रवामुळे या पिकांची नासधुसदेखील होत असल्याचे शेतकरी प्रभाकर नाईक यांनी सांगितले.
आतापर्यंत दोन हजारहून अधिक कांद्याच्या माळी वेगवेगळ्या बाजारात पाठविण्यात आल्या आहेत. अलिबागचा पांढरा कांदा चविष्ट व औषधी गुणधर्म याचा असल्याने त्या कांद्याला मागणी प्रचंड वाढली आहे. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधारणतः एक कोटीहून अधिक उलाढाल कांदा उत्पादक शेतकर्यांकडून झाल्याचा अंदाज आहे.
सतिश म्हात्रे
कांदा उत्पादक शेतकरी