। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मिनाक्षी पाटील यांचा स्मृतीदिन शनिवारी (दि.29) सकाळी अलिबागमध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांचे 29 मार्च 2024 मध्ये निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांचा प्रथम स्मृतीदिन राजकीय, सामाजिक, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रामार्फत साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ व प्रभाकर पाटील वाचनालयाच्या वतीने शेकापच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा स्मृतीदिन पत्रकार भवनमधील सभागृहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, सार्वजनिक वाचनालयाचे जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, ज्येष्ठ नाट्यकर्मी शरद कोरडे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा चारूशिला कोरडे, नंदू तळकर, आर. के. घरत, हेमकांत सोनार,प्रभाकर पाटील वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी, अॅड. राजेंद्र जैन, ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे, किशोेर सुद, साहित्यिक राजाराम भगत, सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह संतोष बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागेश कुलकर्णी यांनी मीनाक्षी पाटील यांच्या राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, सहकार अशा सर्वच क्षेत्रातील कार्याची माहिती देत त्यांच्या जुन्या आठवणांना उजाळा दिला.
अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात शेकापच्यावतीने मीनाक्षी पाटील यांचा स्मृती दिन साजरा केला. मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. शेकापचे कार्यकर्ते व शेतकरी भवन कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बँक अधिकार्यांसह कर्मचारी उपस्थित होते.