| पनवेल | प्रतिनिधी |
शिक्षण व त्या अनुषंगाने ज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून कर्मवीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम केले, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वावंजे येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या वावंजे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीराम पाटील कॉमर्स, सायन्स ज्युनिअर कॉलेज व लक्ष्मण अर्जुन पाटील प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, एन.डी. पाटील यांचे चिरंजीव प्रशांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, उद्योजक जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, माजी सचिव प्रा. गणेश ठाकूर, विठ्ठल शिवणकर, स्थानिक शुल्क कमिटी चेअरमन जी.आर. पाटील, पंकज पाटील, डी.बी. म्हात्रे, एम.डी. पाटील, वासुदेव चोरमेकर, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद पवार यांनी पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात शिक्षण पोहोचविण्यासाठी कर्मवीर अण्णांनी शिक्षण संस्था उभी केली आणि लक्षावधी विद्यार्थी हे जीवनाच्या विविध क्षेत्रामधील शिक्षण घेऊन अतिशय मोलाची कामगिरी करत आहे. त्यांची तयारी कर्मवीरांच्या विचारातून झाली आणि या विचाराचा विस्तार होत आहे. एक काळ असा होता की हा विस्तार सातारा, कोल्हापूर व सांगली अशा विभागात होत होता. रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा आहे, त्यामुळे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची अधिक गरज असल्याची नोंद एन. डी. पाटील यांनी घेतली. आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात 37 च्या आसपास शाखा उभारण्यात संस्था यशस्वी झाली आणि याचे श्रेय एन.डी. पाटील यांना द्यावे लागेल. त्यानंतरच्या काळात दि.बा. पाटील आणि अन्य सहकार्यांची यामध्ये मेहनत आहेत. आता रायगडचा चेहरा बदलला आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ अनेक कारखाने उभे राहात आहेत, त्या अनुषंगाने हजारो उद्योग निर्माण होत आहेत, त्यानुसार स्थानिक माणसाला संधी मिळणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षणाचे वजन मोठे असते. त्यामुळे शिक्षण आणि आत्मविश्वासाने ज्ञानार्जन करण्याची गरज लक्षात घेऊन संस्थेने कात टाकली असून, त्यानुसार आधुनिक शिक्षणाची कास धरली आहे, असे अधोरेखित करून संस्थेतील सहकार्यांना धन्यवाद दिले.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, एखाद्या शाखेची नवीन इमारत उभी राहते तेव्हा ती शाखेसाठी गर्वाची बाब असते. सुंदर इमारत आणि व्यवस्था चांगली आहे या ठिकाणी 1400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाखेसाठी जमीन देण्यापासून ते इमारत उभी करण्यासाठी गेल्या 40- 50 वर्षात योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करणे गरजेचे आहे.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन जी. आर. पाटील यांनी सांगितले की, वावंजे अत्यंत दुर्गम भाग होता. या विभागात दि.बा. पाटील, दत्तूशेठ, जनार्दन भगत, वाजेकरशेठ, झिपरूशेठ, गोटीराम पाटील यांनी 11 विद्यालये उभारली, त्यामुळे या भागाचा विकास झाला.