प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी भूखंडाची मागणी

पालिकेच्या अधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

| पनवेल। वार्ताहर ।

पनवेल शहरात भटक्या व पाळीव श्‍वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी भूखंडाची गरज निर्माण झाली आहे.

पनवेल पालिकेच्या स्थापनेच्या 6 वर्षानंतर शासनाने पालिकेच्या स्वतंत्र पशुधन विकास अधिकारी या पदावर डॉक्टर नेमले आहेत. डॉ. बी. एन. गिते यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. डॉ. गिते यांनी लवकरच पालिकेमध्ये भटक्या मृत प्राण्यांसाठी शवदाहिनीच्या उभारणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सूरु केला आहे. शवदाहिनीसाठी पालिका भूखंड शोधत असल्याचे डॉ. गिते यांनी पनवेलच्या पर्यावरण व प्राणी मित्रांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

महापालिकेच्या परिसरात सिडको महामंडळाने वसविलेले नियोजनबद्ध वसाहती असल्याने या पालिकेला स्मार्ट शहराचा दर्जा मिळत आहे. मात्र या शहरांमध्ये नागरीकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध असल्या तरी भटक्या व पाळीव श्‍वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पालिकेने पाळीव श्‍वानांचा अद्याप शहरात सर्वेक्षण केले नाही. पाळीव श्‍वानांचे परवाने अद्याप मालमत्ता धारकांना पालिकेने दिले नाहीत. यापूर्वी पनवेल पालिकेच्या सदस्यमंडळाने सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय न घेतल्याने नवीन निवडूण येणा-या पालिका सदस्यांना श्‍वान परवाना देण्याविषयी आणि त्याच्या शुल्काची रकमेविषयी निर्णय घेऊ शकतील.

पालिका क्षेत्रात भटक्या श्‍वानांसाठी निर्भिजीकरणाचे काम सूरु असून सरासरी दीडशे श्‍वानांवर महिन्याला निर्भिजीकरणाची शस्त्रक्रीया केली आहे.

डॉ. गिते
पशुधन विकास अधिकारी
Exit mobile version