दिघी-मुंबई बससेवा सुरु करण्याची मागणी

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
दिघी-मुंबई ही सकाळी 10 वा. सुटणारी एसटी ही गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासून सुरु होती. परंतु कोरोना प्रादुर्भावापासून बंद करण्यात आलेली बस आजतागायत पुन्हा सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून ती तातडीने सुरु करावी, अशी मागणी लेखी अर्जाद्वारे शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश भिकू धोपट यांनी आगार व्यवस्थापक, श्रीवर्धन व विभाग नियंत्रक, रायगड (पेण) यांच्याकडे केली आहे.

ही बस स.10 वा. दिघीहून सुटून बोर्ली पंचतन, गोंडघर, म्हसळा मार्गे मुंबई अशी चालवली जात असे व मुंबईहून रात्री 10 वा. सुटून सकाळी 4 ते 5 वा.चे सुमारास दिघी येथे पोहोचत असे. ही बस बंद करण्यात आल्यामुळे प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत असून त्यांना दुसर्‍या मार्गावरील गाड्यांमुळे प्रवास खर्चाचा ज्यादा भुर्दंड विनाकारण सोसावा लागत आहे.

बोर्लीपंचतन ही श्रीवर्धन तालुक्यातील एकमोठी बाजारपेठ असून त्याच्या आजूबाजूला 25-30 खेडे गावे आहेत. तिथे बरीच वर्षे एस.टी.ची निवारा शेड होती. परंतु शेडची जागा कागदोपत्री सार्वजनिक बांधकाम खात्याची असल्यामुळे सदरची शेड तोडण्यात आली. तिथे जनहितार्थ पुन्हा निवारा शेड उभारण्यात यावी, अशीही मागणी धोपट यांनी केली आहे.

Exit mobile version