जिते येथे डेंग्यू सदृश्य साथ

आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा; नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

। खरोशी । वार्ताहर ।

आठवडाभरापासून पावसाला सुरुवात झाली असली, तरी पेणसह अनेक गावांमध्ये विविध आजारांची साथ जोरात येत असल्याचे दिसून येत आहे. जिते प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिते आणि रावे या दोन गावांमध्ये डेंग्यू सदृश्य रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. जिते गावातील 17 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल आला असतानादेखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या म्हणण्यानुसार जिते येथे डेंग्यूचा एकही रुग्ण सापडला नसल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे. असे असले तरी गावात डेंग्यूची साथ पसरली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पेण शहरातील एका प्रयोगशाळेमध्ये 30 ते 35 रुग्णांची तपासणी केली असता एकट्या जिते गावामध्ये सुमारे 17 रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट मिळालेले आहेत. गावातील सुमारे पंधरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही दिसून येत आहे. याबाबत जिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना विचारले असता जिते गावांमध्ये डेंग्यूचा एकही रुग्ण नाही, गाव स्थिर आहे. अशा प्रकारची माहिती देऊन अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे. शासनाने या डेंग्यू आजाराची तात्काळ दखल घेऊन डेंग्यूची साथ रोखावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. डेंग्यूचे रुग्ण हे पेण शहरातील खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत.

Exit mobile version