कळंब-धनगरवाडी रस्त्याची दुरवस्था

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील कळंब-धनगरवाडी रस्ता अत्यंत जीर्णावस्थेत असून, जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील खडी निघून गेल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज अनेक वस्तीतील नागरिक प्रवास करत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामे सुरू आहेत, नवनवीन बंगल्यांचे बांधकामही सुरू आहे; मात्र, ग्रामस्थांना रस्त्याने प्रवास करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. विकासकामे होत असताना मूलभूत सुविधा असलेला रस्ता मात्र दुर्लक्षित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदन दिले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाईल. प्रशासनाने दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा अपघातांची जबाबदारी शासनावर टाकली जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version