| अलिबाग |वार्ताहर |
श्रीवर्धनमधील जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवारी (दि. 23) घडली आहे. या घटनेने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या टक्केवारीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण मोरे असे या लाचखोर उपअभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार यांना श्रीवर्धन तालुक्यातील भावे बौद्धवाडी येथील सभागृहाच्या बांधकामासाठी सात लाख रुपयांचा ठेका 2023-24 या आर्थिक वर्षात मिळाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून एक लाख 40 हजार रुपयांचे बिल मंजूर झाले. परंतु, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून या बिलाची मंजुरी मिळवण्यासाठी प्रवीण मोरे यांनी तक्रारदाराकडून तेरा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात 22 जानेवारीला तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणी करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच घेताना मोरे यांना गुरुवारी (दि.23)रंगेहाथ पकडले. आरोपीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामाची टक्केवारी घेत असल्याचा प्रकार या घटनेतून उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.