तळा बाजारपेठेत शुकशुकाट

| तळा | प्रतिनिधी |

पावसाळ्याच्या आगमनासोबतच शेतकरी वर्ग भात लावणीच्या कामात गुंतल्याने तळा शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भात शेतीच्या कामाला वेग दिला आहे. शेतीची लगबग असल्याने शेतकरी आणि शेतमजूर सकाळपासूनच शेतात कामाला लागतात. त्यामुळे बाजारपेठेत नेहमीची वर्दळ दिसून येत नाही. सहसा शेतमालाची खरेदी-विक्री, खत-बियाणे आणि दैनंदिन गरजांच्या खरेदीसाठी गजबजणारी तळा बाजारपेठ सध्या निर्मनुष्य भासत आहे. कपड्यांची दुकाने, भांडी, किराणा तसेच हॉटेल्समध्येही ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त असल्याने बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला आहे. मात्र, लावणी पूर्ण झाल्यानंतर बाजारपेठ पुन्हा पूर्ववत होईल व ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version