तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

नागरिकांमधून समाधान व्यक्त

। तळा । वार्ताहर ।

तळा शहरातील पुरातन काळापासून असलेल्या महादेव तलावातील गाळ काढण्याच्या कामास अखेर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तळा शहरातील ब्रम्हाली येथे पुरातन महादेव मंदिरासमोर असलेल्या तलावाची गेल्या 15 ते 16 वर्षांपासून स्वच्छता करण्यात आली नसल्याने या तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचले होते. शहरातील भोईर वाडी, फोंडळवाडी, मुंढ्याची वाडी, परीट वाडी, जोगवाडी यांसह बहुतांश वाड्यातील गणपती मूर्तींचे विसर्जन या तलावात केले जाते. दरवर्षी होत असलेल्या मूर्त्यांच्या विसर्जनामुळे तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून तलावाची स्वच्छता करण्यात आली नसल्याने तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ जमा होऊन उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी आटून पाण्याचा उग्र वास सर्वत्र पसरला होता. यामुळे तलावाशेजारी राहणार्‍या नागरिकांना व महादेव मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव यांच्या माध्यमातून दोन जेसीबींच्या सहाय्याने तलावातील गाळ काढण्यास सुरुवात झाल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version