रामधरणेश्‍वर डोंगरावर वणव्यात वनसंपत्ती नष्ट

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्‍वर डोंगरावर वणवा लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून नष्ट झाली. वणवा लागल्याचे समजताच स्थानिक पत्रकार सोगावकर यांनी वनविभागाला दूरध्वनीवरून संपर्क साधला असता बहुतेक वनाधिकारी यांचे फोन स्वीच ऑफ आले तर काही अधिकारी यांची नियुक्ती इतर ठिकाणी असल्याने सहकार्य करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. सोगावकर यांनी वेळ न दवडता मुनवली येथील पर्यावरणप्रेमी श्री.सचिन घाडी यांच्याशी संपर्क साधून वणव्याबाबतीत माहिती दिली असता त्यांनी त्वरित आपल्या मित्रमंडळीसह वणवा ठिकाणी जाऊन रात्री उशिरापर्यंत मेहनतीने आग आटोक्यात आणली. डोंगरावर आदिवासींचे घरे मोठ्या प्रमाणात असल्याने ती वाचविण्यात यश आले,तसेच याठिकाणी आजूबाजूच्या गावातील हजारो गुरे चरत असतात,त्या गुरांच्या चार्‍याचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान रोखण्यात यश आले आहे. याठिकाणी औषधी वनस्पती, रानटी मेवा मोठ्या प्रमाणावर असल्याने जळून त्याचेही नुकसान झाले आहे. सचिन घाडी यांच्यासह नितीन घाडी, अक्षय नागावकर, गितेश ठकरूळ, समिर ठकरूळ, विनय पंडम, रोशन अनमाने, रोशन पुजारी, समिर अनमाने, प्रतिक अनमाने, केदार ठकरूळ, निकेश अनमाने, करण खाडे, प्रसाद मसुरकर आदी मित्रपरिवार मदतीला धावून आल्यामुळे त्या सर्वांचे पर्यावरणप्रेमींनी आभार मानले तसेच आग लावणार्‍या समाजकंटकांचा शोध घेऊन वनविभागाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version