दहिवली पुलाच्या संरक्षण रेलिंगची दुरवस्था

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर मालेगाव दहिवली येथील पुलावरून यावर्षीच्या पावसाळ्यात महापूर आल्याने तीनवेळा पूल पाण्याखाली होता. त्यामुळे पुलासाठी लावलेले लोखंडी संरक्षक कठड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग त्या ठिकाणी नवीन पुलाच्या निर्मितीकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत.

माथेरान-नेरळ- कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर दहिवली मालेगाव येथे उल्हास नदीवरील पूल आहे. साधारण दीडशे मीटर लांबीचा हा पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात उल्हास नदीला महापूर आल्यानंतर पूल बुडून जातो. या पुलावरून यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल तीनवेळा पाणी गेले आहे. त्यात 22 जुलै रोजी 24 तास पुलावरून महापूरचे पाणी गेल्याने त्या पुलाचे लोखंडी संरक्षण कठड्यांची नासधूस झाली आहे. दुसरीकडे पुलावरून रस्त्याचे डांबरी पट्टेदेखील महापुराच्या पाण्याने धुवून नेले आहेत. त्यामुळे 24 तास वाहतूक सुरु असलेल्या या पुलावर लोखंडी कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. या पुलाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन पुलाच्या कामाची निविदा मंजूर झाली आहे.

निधी उपलब्ध झाल्यावर तात्काळ दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील. तर नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्याची कार्यवाही पावसाळा संपल्यावर तात्काळ होईल.

संजीव वानखेडे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
Exit mobile version