नांदगावमधील मुस्लिम तरुणांचा शेकापमध्ये प्रवेश
| मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |
ज्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून दिले आहे, त्यांनी गेल्या पाच वर्षांत विधानसभेत मुरुडचे प्रश्नच मांडले नाहीत. त्यामुळे मुरुडचा विकास रखडला असून, तालुका पाच वर्षे मागे गेला आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचतच नाहीत, अशी टीका शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी नांदगावमध्ये बोलताना केली. दरम्यान, येथील अनेक मुस्लिम तरुणांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यांचे चित्रलेखा पाटील यांनी पक्षाच्यावतीने स्वागत केले.
नांदगावमधील घोले राईस मिलच्या पटांगणावर शेतकरी कामगार पक्ष युनिटी ग्रुपच्यावतीने इंडिया आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.स्व. प्रभाकर पाटील यांचा आदर्श समोर ठेवून मी व माझा पक्ष काम करीत आहोत. बॅ. अंतुले साहेबांनी अलिबाग व मुरुड तालुके एकमेकांना जोडले. त्यांनी अखंड जपलेल्या सर्वधर्मसमभावाची आज समाजाला गरज आहे. आजचे सत्ताधारी जनतेच्या अनेक प्रश्नांची उकल करु शकले नाहीत, त्यांनी केवळ समाजा-समाजामध्ये जातीपातीत भांडणे लावण्याचीच कामे केली. म्हणूनच आज जो तो म्हणतोय, राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. आघाडीतर्फे मला तिकीट मिळून मी निवडून आल्यास तुमचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
यावेळी नांदगावच्या खालच्या मोहल्ल्यातील अनेक मुस्लिम तरुणांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांचे त्यांनी पक्षाच्यावतीने स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडिया आघाडीचे मुरुड तालुका प्रमुख अस्लम हलडे यांनी केले. याप्रसंगी नांदगावच्या ग्रामपंचायत सदस्या मंजुम आप्पा घोले, रिझवान फहीम यांनी आपले विचार मांडले. मेळाव्याला तुकाराम पाटील, मनोहर बैले, चंद्रकांत कमाने, राहिल कडू, इम्तियाज मलबारी, वामन चुनेकर, सरपंच हिरकणी गिदी, सरोज दिवेकर, नौशाद मुजावर, उमेश कासार, सुदेश घुमकर, इस्माईल शेख आदींसह मुस्लिम महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.