प्रारूप विकास योजनेसाठी दिल्या हरकतीवजा सूचना
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल पालिकेने पनवेल महानगर क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. त्याबद्दल नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षाकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी नागरिकांना भेडसावणार्या समस्यांचा योग्य अभ्यास करून ऊहापोह केला आहे. पनवेलचा विकास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादनही श्री. शितोळे यांनी केले.
पालिकेला केलेल्या सूचनात त्यांनी सेक्टर 34,35 व 36 ला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला आहे. मात्र, कांदळवन आणि इमारतींच्या सरंक्षण भिंती यांच्यात सिडकोच्या आराखड्यात सर्विस रस्ता आहे. मात्र, प्रत्यक्ष समुद्राच्या भरतीचे पाणी इमारतींच्या संरक्षण भितींना लागत आहे. तिथे सिडकोच्या आराखड्याप्रमाणे रस्ता करण्यात यावा तसेच वाशी नवी मुंबईच्या आधारावर मिनी सी-शोरसारखे उद्यान विकसित करावे. सेक्टर 41 प्लॉट-1 येथे कामोठे शहरात प्रवेश करताना रिकाम्या प्लॉटवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा अथवा स्मारक उभे करावे. जवाहर इंडस्ट्रीलगत असलेला रिकामा प्लॉट मैदान म्हणून घोषित करावा, मैदान तयार करण्यासाठी नागरिक, तरुणांनी स्वखर्चाने निधी उभारून कामे केलीत, पालिकेने तिथे अपंग शाळेचे आरक्षण टाकले आहे. पण, कामोठेमध्ये एकही मैदान नाही, त्यामुळे शाळेसाठी दुसरा भूखंड देण्यात यावा. सर्वच मुलांना वेंगसरकर अकादमीमध्ये जाऊन क्रिकेट खेळणे शक्य नाही, असेदेखील सुचवले आहे. आदिवासी पाडा (सेक्टर-1) ते सेक्टर 21 (विस्टा कॉर्नर) लगतचा नाल्यातील गाळ आजतागायत काढण्यात आला नाही, तसेच नाला बंदीस्त नसल्याने तिथे दुर्गंधी येते. पूर्वी तिथे ओढा होता, त्यात पावसाचे पाणी वाहून जात. मात्र, आजूबाजूच्या जागेचा विकास झाल्याने ओढ्याचे रूपांतर नाल्यात झाले. भविष्यात ज्याप्रमाणे मुंबईला आज मिठी नदीच्या पुराचा धोका आहे, तसा कामोठेलादेखील आहे. त्यामुळे नाल्याचा गाळ काढून त्याला रुंद व खोल करणे तसेच नाल्याच्या आजूबाजूला विविध वनस्पती लावून परिसर सुशोभित करणे अधिक सोयीचे होईल. 10-15 वर्षांपूर्वी खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या पाणथळ जमिनी होत्या. मात्र, पंतप्रधान आवास योजना आल्याने बर्याच जमिनींमध्ये भराव टाकून इमारती निर्माण केल्या आहेत. खाडीकिनारी शिल्लक असलेल्या पाणथळ जागेवर दुर्मिळ तसेच परदेशी पक्षी येतात. पक्ष्यांचा अधिवास टिकून ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नवी मुंबई पालिकेने पामबीच-सिवूड येथेच्या प्रमाणे पाणथळ जागा जपून विकास केला आहे, त्या आधारावर खांदेश्वर स्टेशन परिसराचा विकास करावा. सदर सूचना करण्यास मा. नगरसेवक प्रमोद भगत, सामाजिक कार्यकर्त्या रंजना सलोडीकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.