माजी आमदार पंडित पाटील यांचा आरोप
खंडाळे ग्रामपंचायतमध्ये पेव्हरब्लॉक रस्त्याचे लोकार्पण
। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग आणि मुरूड तालुक्याचा विकास करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कटिबद्ध आहे. शेतकरी कामगार पक्षाने मतदार संघातील जनतेसाठी कामे मंजूर करून विकासकामे पूर्णत्वाकडे नेत त्यांचे लोकार्पण केले आहे. याउलट सत्ताधारी आमदाराने लोकोपयोगी कामे करण्याचे आश्वासन देऊन गेल्या पाच वर्षात जनतेला केवळ विकासाबाबतचे गाजर दाखवले आहे. यामुळे अलिबाग विधानसभा मतदार संघात विकास कामांना खीळ बसली आहे. असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केला.
तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या प्रेरणेने माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाने, ऍड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अंतर्गत रस्ता आणि स्वच्छतागृहाचाच लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला. यावेळी शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, प्रदीप नाईक, नयन कवळे, माजी सरपंच नाशिकेत कावजी, प्रशासक मंगेश पाटील, ग्रामसेवक शेखर बळी, रामदास कावजी, पांडुरंग मोरे, रवींद्र पाटील, सविता ओव्हाळ, प्रतिभा मोरे आदी ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
रस्त्याचे लोकार्पण झाल्यानंतर माजी आमदार पंडित पाटील यांनी खंडाळे ग्रामस्थांबरोबर चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. खंडाळे ग्रामस्थांना पाण्याचे समस्येने सतावले आहे. हि पाण्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पाणीपुरवठा विभागाच्या भियंत्याच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे खंडाळा ग्रामपंचायत परिसरात खोदलेल्या पाणी स्रोताला पाणी लागले नसल्याने पाणी समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यावर पंडित पाटील यांनी गोकुळेश्वर तलावाच्या नजीक विहीर बांधून त्यातून खंडाळे गावाला पाणी देण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केले आहेत. असे सांगून लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे ग्रामस्थांना माजी आमदार पंडित पाटील यांनी आश्वासित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून बांधण्यात आलेल्या पेव्हरब्लॉकच्या रस्त्याची आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांची केलेल्या उभारणीची पाहणी ग्रामस्थांच्या समवेत पंडित पाटील यांनी केली. त्यानंतर पंडित पाटील यांनी खंडाळे गावातील बुद्धविहाराला भेट दिली. खंडाळे गावातील असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील असे सांगून पंडित पाटील यांनी निरोगी आरोग्य जगण्यासाठी व्यसनाधीन होणाऱ्या नागरिकांना समुपदेशन केले.