आस्वाद पाटील, राजेंद्र पाटील याच्या उपस्थिता कांमाचा शुभारंभ
पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील वहाळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील उपस्थित होते.यावेळी वहाळ ग्रामपंचायत करत असलेल्या कार्याची आस्वाद पाटील यांनी प्रशंसा केली.
वहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्तआयोग अंतर्गत सक्शन वाहन आणि घंटागाडी घेण्यात आल्या आहेत.या दोन वाहनांचे लोकार्पण आस्वाद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच या वेळी एका खाजगी कंपनीच्या सी एस आर फंडातून वहाळ येथील बस स्टॉपवर पिण्याच्या पाण्याची पाणपोई आणि गझापो अर्थात अल्प विश्रांती ठिकाण कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण देखील आस्वाद पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
आस्वाद पाटील यांनी वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोरोनाविषाणू प्रतिरोधक लसीकरण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या लोकार्पण सोहळ्या बाबत राजेंद्र पाटील म्हणाले की उलवे नोडमध्ये पन्नास हजाराहून अधिक लोकवस्ती झाली आहे त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन सक्षम राहण्यासाठी आम्ही सक्शन वाहन खरेदी केले आहे. तसेच परिसरामध्ये रोगराई पसरू नये म्हणून घंटागाडी देखील खरेदी केली आहे त्यामध्ये सुखा कचरा,ओला कचरा असे वर्गीकरणसह कॅरियर बसवलेले आहेत. वहाळ ग्रामपंचायत करत असलेले कार्य पाहून एका खासगी कंपनीने आमच्याशी संपर्क साधला व त्यांच्या कंपनीच्या सीएसआर फंडातील रक्कम योग्य ग्रामपंचायतीला द्यावयाची असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी स्वच्छ पिण्याचे पाण्याची पाणपोई आणि अल्प विश्रांती केंद्र कार्यान्वित करून दिले आहे.
या कार्यक्रमाला आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, शेकापचे माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र पोटफोडे, सरपंच पूजा समीर पाटील, उपसरपंच अमर म्हात्रे, अमित घरत,तंटा मुक्ती समिती अध्यक्ष सिताराम नाईक
मदन रमाकांत घरत,माजी सरपंच अरुण घरत,चेतन घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
\याप्रसंगी कोरोना कालखंडामध्ये कोरोनाविषाणू लागण झाल्याने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणार्या कबीर घरत आणि सचिन गायकवाड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर भगत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.