देवेंद्र फडणवीसांची शिवसेना-ब्रिगेड युतीवर सूचक प्रतिक्रिया

। नागपूर । वृत्तसंस्था ।

शिवसेनेतल्या बंडानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सध्या उद्धव आणि आदित्य ठाकरेंकडून प्रयत्न सुरू आहे. संजय राऊतांच्या कोठडीमुळे शिवसेना आणखी कोंडीत सापडली आहे.

“आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीचं स्वागत केलं आहे. मात्र, “उद्धव ठाकरेंसोबत आता कुणीही युती करायला तयार नाही, त्यांची अवस्था अशी झालीये की आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील”, अशा प्रकारची टीका भाजपाकडून केली जात आहे. यावरून राजकारण तापू लागलं असतानाच देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. आपण केवळ एका वाक्यात उत्तर देणार असं सांगितलं. “विनाशकाले विपरीत बुद्धी” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी यावर दिली आहे.

Exit mobile version