। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यावर पावसाळी सहलीनिमित्त पुण्याहून 17 जणांचा ग्रुप फिरण्यासाठी आला होता. मात्र धबधब्याखाली पोहण्याचा आनंद घेत असताना दोन तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले. ही घटना रविवारी (दि.12) दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे चाकण एमआयडीसी कंपनीतील 17 जणांचा ग्रुप रविवारी माणगावमधील देवकुंड धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. सर्वजण धबधब्याखाली पोहण्याचा आनंद घेत होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जण पाण्यात बुडाले. गोपाळ राठोड (वय 24, रा.नांदेड) आणि विष्णू ढोख (वय २३, रा.हिंगोली) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रशासनाकडून आपत्कालीन मदत पथके आणि ग्रामस्थांच्या मदतीने युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याने अंधारामुळे शोधमोहीम स्थगित करण्यात आली.






