मंदिरात फुलांची सजावट व आकर्षक रोषणाई
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
अंगारकी संकष्टी चतुर्थीला अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. बल्लाळेश्वर मंदिर मंगळवारी (दि.13) भाविक भक्तगणांनी फुलून निघाले. अंगारकी संकष्टीनिमित्त श्री बल्लाळेश्वराची मूर्ती फुलांनी सजवली होती. सर्वत्र फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती. दर्शनासाठी पालीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.
संकष्टीनिमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोईसाठी ट्रस्टच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही असे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र गद्रे व विश्वस्त मंडळाने सांगितले.
वाहनांची वर्दळ
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतूकिस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतू पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकाच्या सोइसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छतागृह देखील उभारण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
– जितेंद्र गद्रे अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली