। रायगड । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवानिमित्ताने अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना रेशन दुकानामधून आनंदाचा शिधा मिळणार असल्याची घोषणा करून जवळपास महिना झाला आहे. गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना रवा, चणाडाळ, पाम तेलापैकी साखरेचा साठा जिल्ह्यातील फक्त तीन गोदामांमध्ये दाखल झाला आहे. इतर वस्तूंचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे उरलेल्या पाच दिवसांत आनंदाचा शिधा मिळणार कसा, असा प्रश्न जिल्ह्यातील लाभार्थी विचारत आहेत. नेहमीप्रमाणे आताही जिल्हा पुरवठा विभागाला आनंदाच्या शिधाचे वेळेत वाटप करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.
सण-उत्सवाआधी आनंदाचा शिधा मिळाला, असे आतापर्यंत एकदाही झालेले नाही. होळी, दिवाळी, गणेशोत्सवानंतरच आनंदाच्या शिधाचे वाटप होते. शेवटच्या ग्राहकांना काही वस्तू मिळतात, तर काही वस्तू कीटमधून गायब झालेल्या असतात. आतातर पुरवठा विभागाने कहरच केला आहे. जिल्ह्यात लाभार्थी कार्डधारकांची एकूण संख्या चार लाख 63 हजार 610 इतकी असताना एकूण तीन लाख 96 हजार 991 इतक्याच लाभार्थ्यांचे धान्य मंजूर झाले आहे. मागणी कमी प्रमाणात मंजूर झाल्याने इतर लाभार्थ्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वेळेत पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यातील 21 गोदामांमध्ये पुरेशा प्रमाणात शिधा असणे आवश्यक आहे. सोमवारपर्यंत 21 पैकी अलिबाग, पोयनाड, पेण येथील गोदामांमध्ये फक्त साखरेचा पुरवठा झाला होता, तर पेण येथे रवा आला आहे. हा साठा अलिबाग आणि पेण तालुक्यासाठी आहे. उर्वरित 13 तालुक्यांसाठी अद्याप रवा, चणाडाळ आणि पाम तेल आलेलेच नाही. या सर्व वस्तू पॅक करून त्याचे वितरण करावे लागणार लागते. आनंदाचा शिधा एका खास पिशवीमध्ये वाटला जातो, ज्या पिशवीवर देशातील, राज्यातील प्रमुख नेत्यांचे फोटो असतात. अशा छापील पिशव्याही अद्याप आलेल्या नाहीत. जोपर्यंत छापील पिशव्या येत नाहीत, तोपर्यंत पुरवठा विभागाकडून त्याचे वितरण केले जात नाही. या सर्वातून मार्ग काढत पुरवठा विभागाला रेशन दुकानदारांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवावा लागणार आहे. यात किती दिवस जातील, हे सांगता येत नसल्याने यंदाचा गणेशोत्सवही आनंदाच्या शिधाविना साजरा करावा लागणार का, असा प्रश्न लाभार्थी विचारू लागले आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या आनंदाच्या शिधा कीटवर देशातील, राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींचे फोटो असायचे. जोपर्यंत अशा पिशव्या छापून येत नाही, तोपर्यंत वितरण थांबवले जात असे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आताचा शिधा वाटपही अशा छापील पिशव्यांमधून होईल, असा अंदाज होता; परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आताच्या पिशव्यांवर लोकप्रतिनिधींचे फोटो नसणार आहेत.
सणाच्या दिवसात किराणा मालातील आवश्यक वस्तू घरात असाव्यात, जेणेकरून अल्प उत्पन्नातील लोकांना सण आनंदात साजरा करता येईल, हा मुख्य हेतू आनंदाचा शिधा वाटपाचा होता; परंतु ही योजना सुरू झाल्यापासून कधीही वेळेत शिधा पोहोचलेला नाही. दिवाळीसारखा सण संपून गेला तरी गरिबांच्या घरात आनंदाचा शिधा पोहोचत नाही. यंदाच्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. प्रती संच 100 रुपये या सवलतीच्या दराने मिळणार्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. आनंदाचा शिधा संचाचे वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.
आनंदाचा शिधा कीटमधील जिन्नस अद्याप जिल्ह्यात दाखल झालेल्या नाहीत. वाहतूक करणार्या कंत्राटदारामुळे त्यास वेळ लागत आहे. यासंदर्भात राज्य शासनाला कळविण्यात आलेले आहे. कंत्राटदाराकडून आम्हीही आढावा घेत असून सर्व जिन्नस वेळेत पोहोचाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड