दोन्ही बाजूला खड्डे झाल्याने विहूर पुलाची दुरवस्था

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात फक्त एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडताच मुरुड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत असणार्‍या रस्त्यांची दैना उडाली आहे. मागील वर्षाचा पाऊस पडल्यानंतर पडलेले रस्ते दुरुस्त न केल्यामुळे यंदाच्या या पावसात आता मोठं मोठे खड्डे दिसू लागले आहेत.पावसाचे प्रमाण कमी असताना सुद्धा काही ठिकाणी खड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विहूर येथील छोट्या पुलाजवळ प्रवास करणे फार जिकरीचे झाले आहे.कारण या पुलाच्या उजव्या बाजूला पावसामुळे मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. तर डाव्या बाजूला संरक्षक भिंत न बांधल्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीस खुला नसल्याने असलेल्या रस्त्याला सुद्धा खड्डे पडल्यामुळे दुचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उजव्या बाजूस मोठाले खड्डे तर डाव्या बाजूला खड्डे त्यामुळे एखादे मोठे वाहन आल्यावर वाहन चालकांची मोठी पंचाईत होऊन दुचाकी वाहनांची छोटे मोठे अपघात होत आहेत.

संरक्षक भिंतीला पैसे मंजूर होऊन सुद्धा या कामाला सुरुवात करता आलेली नाही.तर पावसाळ्यापूर्वी विहूर पुलाच्या उजव्या बाजूला पडणारे मोठं मोठे खड्डे भरून टाकण्याचा सार्वजनिक बांधकाम खात्यास विसर पडल्याने येन पावसाळ्यात या खड्ड्यांचे तलाव झालेले पहावयास मिळत आहे.कोणतेही काम वेळेत न केल्यामुळे पाऊस कमी पडून सुद्धा लवकरच रस्त्यांना खड्डे पडले आहेत. या पुलाच्या पुढील रस्ता सुद्धा खड्डेमय झाला आहे.त्यामुळे वेळीच दखल न घेतल्यास खाड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याने पाऊस काही काळ थांबताच खड्डे बुजविण्याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी नागिकांकडून मागणी होत आहे.

Exit mobile version