चित्रलेखा पाटील यांचे कौतुक; शेतकरी कामगार पक्षाच्या रोजगार मेळाव्यास मुरुड तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद
। आगरदांडा । गणेश चोडणेकर ।
शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, अलिबाग अर्बन बँक व रायगड बाजारसारख्या संस्था काढल्याने हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाले.आजच्या घडीला बेरोजगारी ही फार वाढली आहे. आम्हाला गरिबांच्या घरातील प्रत्येकाला नोकरी द्यावयाची आहे. यासाठी कोणताही पक्षभेद पाळला जाणार नाही. प्रत्येकाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मुलाखती होऊन कंपनीचे अधिकारी तरुणांची निवड करून ताबडतोब नियुक्ती पत्र देणार आहेत. तरुणांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा, आपण मुलाखत धीटपणे देऊन उत्तीर्ण व्हावे, अशा सदिच्छा शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केल्या.
आज मुरुड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात शेकापतर्फे भव्य असा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित तरुण-तरुणींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर, मधुकर पाटील, उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, माजी सरपंच विजय गिदी, तुकाराम पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच इम्तियाज मलबारी, माजी नगरसेविका प्रीता चौलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, आम्ही सर्व कंपन्यांशी संपर्क साधला, त्यांना आवश्यक असणारी पदे व त्यासाठी आवश्यक असणारी अर्हता जाणून घेऊन त्यांना आपले अधिकारी अधिकारी मुलाखतीसाठी पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार मुलाखत घेऊन थेट नियुक्ती पत्र देण्याची पद्धत सर्वप्रथम या रोजगार मेळाव्यातून होत आहे, याचा आनंद होत आहे. अविवाहित तरुणांनी पुणे, मुंबई अथवा इतर दूरवरच्या कंपनीत नोकरी मिळत असेल, तर त्याचा आवश्यक लाभ घ्यावा. नोकरीमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात बद्दल घडत असतो. युवकांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवून मुलाखत देण्याचे आवाहन त्यांनी केले. रायगड जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांनी तरुणांनी स्वतःचा आत्मविश्वास वृद्धिंगत करून मुलाखती निर्भयपणे द्याव्यात, यश आपणास निश्चितच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
2000 जणांची नोंदणी
रोजगार मेळाव्यास युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यामधून 2000 युवक व युवतींनी मुलाखती दिल्या. त्यापैकी 554 उमेदवारांना प्रत्यक्षात थेट नोकरीची संधी मिळाली आहे. तालुक्यातील शुभम करडे व मंदार साखरकर यांना सेफ्टी ऑफिसर म्हणून पुणे येथील जॉब कॉम्युनिकेशन सर्विस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 50 हजार रुपये पगारावर नियुक्ती देण्यात आली आहे.
चित्रलेखा पाटील यांची एक वेगळी कल्पना असून, त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून त्यांचे जीवन समृद्ध होणार आहे. रोजगार मेळावा घेऊन तरुणांना नोकर्या प्रदान कराव्यात, याबाबत कोणत्याही पक्षाची इच्छा झाली नाही. परंतु, शेतकरी कामगार पक्ष हा सर्वात प्रथम गरीब लोकांचा विचार करणारा पक्ष आहे. तरुणांना रोजगार देण्याचे काम सर्वप्रथम शेकाप करीत आहे.
माजी आ. पंडित पाटील