| खोपोली | प्रतिनिधी |
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक राहुल रंजन महिवाल (भा.प्र.से.) यांनी बुधवार दि.29 जुलै रोजी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राला भेट देऊन विविध संशोधन विभागांची पाहणी केली. केंद्रात सुरू असलेले भात संशोधन, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक उपकरणांची माहिती घेत केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.
भेटीदरम्यान सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांनी महासंचालकांना भात वाण संग्रहालयाची माहिती दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या व शिफारस केलेल्या विविध सुधारित आणि संकरित भात जातींसह जलद भात पैदास कार्यक्रम, संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळांतील अत्याधुनिक उपकरणे आणि त्यांची कार्यक्षमता याविषयी सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
यानंतर आयोजित आढावा बैठकीत डॉ. भरत वाघमोडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महासंचालक राहुल महिवाल यांचे स्वागत केले. तसेच प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या संशोधन कार्याचा आणि विविध उपक्रमांचा आढावा सादर केला.
यावेळी मार्गदर्शन करताना महासंचालक राहुल महिवाल म्हणाले की, संशोधन क्षेत्रात कार्यरत शास्त्रज्ञांच्या संशोधनवृत्तीला सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने केलेले संशोधन वाखाणण्याजोगे असून, येथील भात संशोधनामुळे देशातील भात शेतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच केंद्रातील शास्त्रज्ञांच्या भावी संशोधन कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
महासंचालकांची कर्जत येथील कृषी संशोधन केंद्राला भेट
