नागरी संरक्षण दल उरणतर्फे मार्गदर्शन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागरी संरक्षण दल उरण रायगड (महाराष्ट्र शासन, गृह विभाग) यांच्यातर्फे आपत्ती काळात स्थानिक पातळीवर स्वयंसेवक निर्माण होण्याच्या उद्देशाने नागरी संरक्षण मूलभूत पाठ्यक्रम प्रशिक्षण पाच दिवसीय नागरी संरक्षण प्राथमिक मूलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण समारोपप्रसंगी नागरी संरक्षण दल उरण रायगडचे उपनियंत्रक विजय जाधव, सहाय्यक उपनियंत्रक शशिकांत शिरसाठ, प्रशिक्षण वरिष्ठ लिपीक विलास पाटील, होमगार्ड प्रशासकीय अधिकारी उमेश थळे, अॅड. सुभाष साळुंखे, अॅड. डॉ. के.डी. पाटील, प्रा. पल्लवी पाटील आणि अॅड. भूपेंद्र पाटील उपस्थित होते.
नागरी संरक्षण दल उरण उपनियंत्रक विजय जाधव यांनी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना शपथविधी दिली तसेच आपत्तीसंबंधित मोलाचं मार्गदर्शन करुन व नागरी संरक्षण दलाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण व पाठ्यक्रमाबाबत माहिती दिली. तसेच स्वयंसेवकांनी आपला स्वतःचा व दुसर्याचा जीव वाचवून दुर्घटनास्थळी आपत्तीग्रस्तांना मदत व मनोधैर्य देण्याचे कार्य करावे जेणेकरून मानव व वित्तहानी काहीशी कमी होईल, असे संबोधित केले.
या प्रशिक्षणाप्रसंगी सहाय्यक उपनियंत्रक शशिकांत शिरसाठ यांनी स्वयंसेवकांना नागरी संरक्षण, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये एकूण 34 स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन या प्रशिक्षणामध्ये आधुनिक युद्धनीती तंत्रज्ञान व नागरी संरक्षण का? कसे व केव्हा? नागरी संरक्षण संघटना व सेवा, हवाई हल्ला इशारा व प्रणाली, नियंत्रण केंद्र कामकाज व कार्यप्रणाली, प्रकाश बंदी नियम व तत्त्व, आग व आगीचे प्रकार, कृत्रिम श्वसन पद्धती व उपचार, विमोचन सेवा, आपत्कालीन जखमींना व्यक्तींना वाहून नेण्याच्या पद्धती, प्रथमोपचार तत्त्वे व साहित्य, जखम व रक्तस्त्राव उपचार, रुग्णशबिका, त्रिकोणी बँडेज, दोरी व गाठींचे प्रकार या पाठ्यक्रमात स्वयंसेवकांकडून त्यांनी उत्तम प्रकारे सराव करुन घेतले.
याप्रसंगी अध्यक्ष अॅड. सुभाष साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. अॅड. डॉ. के.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तसेच स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. स्वयंसेवकाचे प्रतिनिधी म्हणून प्रा.पल्लवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अॅड. भूपेंद्र पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.