रसायनी | राकेश खराडे |
कोरोनाचा वार आणि निसर्गाचा मार सहन करत असलेल्या शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले असून गुरांमध्ये लंपी रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. खालापूर तालुक्यात पाळीव गुरांमध्ये विशेषता गाय बैल यामध्ये लंपी रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. जनावरांच्या त्वचेवर गाठ येत असून फोड झाल्याने जनावरे खाणे पिणे सोडत आहेत. गाय आणि बैल यांमध्ये मोठ्या प्रमाणात लंपी रोगाची लागण झाली आहे. आधीच हाताच्या बोटावर मोजता येईल तितका शेतकरी तालुक्यात शिल्लक राहिला असून शेतीच्या जोडीला उदरनिर्वाहासाठी पशुपालन आसरा शेतकऱ्याला आहे. दुभत्या जनावरास लंपी रोगाची लागण झाल्यास त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. लंबी रोगाची लागण झालेल्या गुरांचे मृत्यूचे प्रमाण एक टक्का असले तरी एक जनावरापासून दुसऱ्याला लागण होण्याचे शक्यता असल्याने लंपी रोग झपाट्याने पसरत आहे.या रोगाची जनावरे चौक आसपासच्या भागात सापडली आहेत.
तालुक्यात गुरांमध्ये लंपी रोगाची लागण आढळून आली. गाय आणि बैलांमध्ये लागण असून जवळपास चारशे गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लंपी रोगाची लागण झालेले गुरांना इतर गुरांपासून वेगळे बांधावे जेणेकरून आजार पसरणार नाही. पशुवैद्यकीय विभागाकडून तालुक्यात गावांमध्ये फिरून लसीकरण सुरू आहे.
डॉ. पी एन गायकवाड – पशुवैद्यकीय अधिकारी खालापूर