खालापूरमध्ये जातवैधता प्रमाणपत्रावरून वाद

दलित पँथरची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

| रसायनी | राकेश खराडे |

खालापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेच्या पोटनिवडणुकीत सादर करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित प्रमाणपत्र अधिकृतरीत्या निर्गमित करण्यात आले नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे खालापूर उपशहरप्रमुख यशवंत जाधव आणि दलित पँथर संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर 2026 रोजी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 24 जुलै 2024 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत निशांत सिद्धार्थ पानपाटील (रा. साईबाईनगर, खालापूर) यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यशवंत जाधव यांनीही या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पोटनिवडणुकीत निशांत पानपाटील विजयी झाले होते.

मात्र, निशांत पानपाटील यांनी सादर केलेल्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित प्रमाणपत्राची प्रत धुळे येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नावाने असल्याचे सांगण्यात येत असून, सदर प्रमाणपत्र समितीने निर्गमित केलेले नसल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राची सत्यता, त्याचा वापर आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या कागदपत्रांच्या पडताळणीची अधिकृत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात संबंधित निवडणूक अभिलेख, उमेदवारी अर्ज, जातवैधता प्रमाणपत्र आणि छाननी प्रक्रियेतील कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी यशवंत जाधव आणि दलित पँथर संघटनेने केली आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे संबंधित गटनेते, निवडणूक अधिकारी आणि छाननी अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी तक्रार अर्जातून करण्यात आल्याचे समजते.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढविताना सादर करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्राची सत्यता तपासणे आवश्यक आहे. प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्याने प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दलित पँथरचे कोकण प्रदेशाध्यक्ष आशिष भाई खंडागळे यांनी दिल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.

Exit mobile version